कळव्यात बॅनरवॉर

राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदे गटाकडूनही टीकेचे फलक

ठाणे: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचे बातम्यांनी सर्वत्र खळबळ उडाली असतानाच राष्ट्रवादीच्या खोका-बोका फलकानंतर शिंदे गटानेही लबाड बोका ढोंग करतोय अशी फलकबाजी केली आहे.

ठाण्यातील कळवा परिसरात राष्ट्रवादी विरोधात शिंदे गटाचे बॅनरवॉर रंगले असून दोन्ही पक्षांनी बॅनरच्या माध्यमातून एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. रविवारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून नगरसेवकांनो, विकले जाऊ नका. नाहीतर गद्दार ठराल, अशा आशयाचे बॅनर झळकले होते. त्याला प्रतिउत्तर म्हणून सोमवारी नरेंद्र शिंदे यांच्या वतीने लबाड बोका ढोंग करतोय, करुन करुन भागले आणि प्रवचनाला लागले अशा आशयाचे बॅनर लावून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरु आहे. त्यातही काही नगरसेवकांनी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतल्याची चर्चा आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना एक कोटीचे आमिष दाखविले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर रविवारी कळवा आणि आजूबाजूच्या परिसरात याच विषयाला धरत काही बॅनर झळकले. या बॅनरवर खोका बोका नगरसेवकांनो, स्वत:ला विकू नका, महाराष्ट्राच्या राजकारणात खोका नावाची किड महाराष्ट्राचे राजकीय संस्कार उद्ध्वस्त करुन गेली. ही किड आता कळवा-मुंब्य्रात आली आहे. नगरसेवकांनो, आता त्याच्यापासून लांब रहा. कळवा-मुंब्य्रातील जनता तुमची गद्दारी कधीच माफ करणार नाही, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरच्या खाली रविंद्र पोखरकर यांचे नाव होते.

कळवा भागात लागलेल्या बॅनरला प्रत्युत्तर देण्यात आले असून सोमवारी नरेंद्र शिंदे यांच्या नावाने लागलेल्या बॅनरकडे सर्वाचेच लक्ष केंद्रीत झाले. त्यावर लबाड बोका ढॉंग करतोय, करुन करुन भागले, नि प्रवचन झाडू लागले, नगरसेवक तुमचे तुमच्या हातून चालले, पायाखाली बघा तुमच्या, दुसऱ्याकडे कशाला बोट, नगरसेवक सोडून जातात तर असेल ना तुमच्यात खोट, विश्वास नाही उरला तुमचा तुमच्याच नगरसेवकांवर आता, आधी गळ्यात गळे आणि आता एकदम मारताय लाथा अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा राजकारण तापल्याचे दिसत आहे.