घोडबंदर मार्गावर दोन आठवडे अवजड वाहनांना बंदी

ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील ७०० मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. आज, शुक्रवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. ६ जून पर्यंत ही प्रवेशबंदी असेल.

या मार्गावरून हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणात होते. या दुरुस्ती कामांमुळे ठाणे, घोडबंदर आणि मुंबई-अहमदाबाद मार्गावर मोठी कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई, गुजरात, भिवंडी आणि उरण येथील जेएनपीटी बंदरातून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक घोडबंदर मार्गे होते. या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातून वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही अधिक आहे. राज्य परिवहन सेवा (एसटी) तसेच महापालिकांच्या परिवहन विभागाच्या बसगाड्या देखील येथून वाहतुक करतात. घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्याप्रमाणत खड्डे पडत असतात. त्यामुळे कोंडी होऊन त्याचा फटका वाहन चालकांना बसत असतो.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. अखेर शुक्रवारपासून या कामास सुरूवात होणार आहे. या कामाच्या कालावधीत कोंडीची शक्यता असल्याने अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. येथील अवजड वाहनांची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली आहे.

मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजिवडाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळून खारीगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. किंवा कशेळी, अंजुरफाटामार्गे जातील.

मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना खारीगाव टोलनाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने खारीगाव खाडी पूलाखालून खारीगाव टोलनाका, मानकोलीमार्गे वाहतुक करतील.

नाशिक येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने मानकोली पूलाखालून उजवीकडे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे जातील.

गुजरात येथून घोडबंदरमार्गे ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद असेल. येथील वाहने चिंचोटी नाका येथून कामन, अंजुरफाटा मानकोली, भिवंडीमार्गे जातील