आयआयटी संशोधकांची कामगिरी
मुंबई : रासायनिक कीटकनाशके पिकांचे कीटकांपासून संरक्षण करीत असली तरी त्यांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक संसाधने प्रदूषित होत आहेत. याचा पिकांच्या वाढीवर तसेच जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होत आहे. या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करून उपयुक्त पोषक तत्वे तयार करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला आहे.
कृषी क्षेत्रासमोर कीटकनाशके आणि तणनाशके यांच्या रूपात असलेली अरोमॅटिक संयुगे मोठी समस्या आहे. ही संयुगे विषाक्त (टॉक्सिक) असून बियाण्यांना अंकुर फुटू देत नाहीत, वनस्पतींची वाढ रोखतात, बियाणे आणि वनस्पतींमध्ये साठून राहतात. पारंपरिक पद्धतीने ही प्रदूषके काढण्यासाठी केलेले रासायनिक उपचार किंवा माती काढून टाकणे हा पर्याय तात्पुरता ठरतो. यावर आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी प्रदूषित वातावरणातील जीवाणूंचा शोध घेतला आहे. यातील काही जीवाणूंच्या प्रजाती विशेषतः स्यूडोमोनास आणि एसिनेटोबॅक्टर हे अरोमॅटिक संयुगांचे विघटन करतात. ते प्रदूषकांचे भक्षण करून त्यांचे साध्या, निरुपद्रवी आणि बिन-विषारी संयुगात विघटन करून प्रदूषित पर्यावरण नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात. हे जीवाणू फॉस्फरस आणि पोटॅशिअमसारख्या पोषकतत्वांना द्रवणीय रूपात बदलत असल्याने वनस्पतींना सहजपणे उपलब्ध होतात. तसेच हे जीवाणू इंडोल असेटिक आम्ल तयार करीत असल्याने वनस्पतीची वाढ होते. हे जिवाणू माती स्वच्छ करण्याबरोबरच सुपीकता वाढवतात आणि वनस्पतींना निरोगी आणि सुदृढ बनवतात, असा दावा आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा. प्रशांत फळे यांनी केला आहे. प्रा. फळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश पापडे यांनी पीएच.डी.साठी हे संशोधन केले. एन्व्हायर्नमेंटल टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन या नियतकालिकात अलिकडे हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
गहू, मुगाच्या शेंगा, पालक, मेथी इत्यादी पिकांसाठी स्यूडोमोनास आणि एसिनेटोबॅक्टर या जीवाणूंच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला. या मिश्रणामुळे पिकांची वाढ आणि उत्पन्नात ४५ ते ५० टक्क्यांनी वाढ झाली. काही प्रजाती प्रदूषकांचा नाश करतात, काही पिकांच्या वाढीसाठी, तर काही रोगांपासून संरक्षण करतात. यांना एकत्रित केल्यामुळे निर्माण झालेले जीवाणूंचे दल अनेक कार्य एकाच वेळी सक्षमपणे करतात, असे प्रा. फळे यांचे म्हणणे आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार मानवासाठी उपयुक्त अशा १६८ पिकांना बुरशीची लागण होते. यामुळे जगभरात दरवर्षी १०-२३ टक्के पिकांचे नुकसान होते. आयआयटी मुंबईच्या अभ्यासाने या समस्येवरही उपाय शोधला आहे. हे उपयुक्त जीवाणू बुरशीला मारू शकणारे लायटिक एन्झाईम आणि हायड्रोजन सायनाइडसारखे पदार्थ तयार करतात, असे प्रा. फळे यांनी सांगितले.