ठाण्यात अवतरली अयोध्या

* चंदनवाडीत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण * आ.संजय केळकर यांची उपस्थिती

ठाणे: प्रभु श्रीराम अयोध्येतील विशाल मंदिरात विराजमान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात जणू अयोध्याच अवतरली होती. भाजप शहर उपाध्यक्ष महेश कदम यांनी चंदनवाडी परिसरात आयोजित केलेल्या अयोध्या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाला आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती दर्शवली.

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाणे शहरातील विविध भागांत मिरवणुका काढण्यात आल्या. ब्राम्हण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रामायणातील पात्रांची वेषभुषा करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या मिरवणुकीत आ.संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांच्यासमवेत माजी खासादर डॉ.संजीव नाईक हे देखील सहभागी झाले होते.

अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद तमाम भारतीयांना घेता यावा यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे पहाटेपासूनच ठाण्यात सर्वत्र रामनामाचा गजर गुंजत होता. ठाण्यात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ब्राम्हण शिक्षण मंडळ शाळेचे विद्यार्थी राम, लक्ष्मण, हनुमान आदी रामायणातील पात्रे हुबेहुब साकारून सहभागी झाले होते. त्यामुळे साक्षात अयोध्या नगरीच ठाण्यात अवतरल्याचे चित्र दिसून आले.

रामजन्मभूमीसाठी ५०० वर्षात ८० युद्धे झाली. त्यानिमित्त चंदनवाडी भागात भाजप उपाध्यक्ष महेश कदम यांच्या पुढाकाराने आ.संजय केळकर यांच्या उपस्थितीत जय श्रीराम लिहिलेले तब्बल ८० फुगे हवेत सोडण्यात आले. यावेळी अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करून नागरिकांना श्रीराम पेढे वाटण्यात आले.

राबोडीत पाटील चौकानजीक मैदानात भव्य मंडपात विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षक राजेंद्र पाटील, कारसेवक योगेश भोईर यांच्यावतीने करण्यात आलेल्या महाआरतीमध्ये आमदार केळकर सहभागी झाले होते.

चौकट

आजपासून आनंदाचा शिधावाटप

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना दिनाचा मुहुर्त साधून आ. संजय केळकर यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वाटपाला प्रारंभ करण्यात आला.