मास्टिक मिळवण्यासाठी प्राधिकरणाची तारेवरची कसरत
ठाण्यात खड्डे बुजवण्यासाठी पळापळ
ठाणे : खड्डे बुजवण्यासाठी वरदान ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सरकारी यंत्रणांना धावपळ करावी लागत आहे. विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली असून सरकारी यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठाणे महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. घोडबंदर मार्ग तर खड्ड्यातच गेल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कॅडबरी, नितीन कंपनी, वाघबीळ आदी उड्डाणपुलांसह, मुंबई-नाशिक मार्गावर देखील खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स, पेव्हर ब्लॉक पेक्षाही मास्टीक हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडी, एमएसआरडीसी असेल या सर्वच प्राधिकरणांनी मास्टीकचा वापर करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे रस्त्यांची उंची वर खाली होत असली तरी देखील हा पर्याय योग्य ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मास्टीक उपलब्ध होणे कठीण होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
घोडबंदर मार्गावरच मास्टीकचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. मास्टिकचा पुरवठा करणारे पुरवठादार यांची संख्या फार कमी असल्याने मास्टिक वेळेवर उपलब्ध होत नसल्याने यंत्रणांची चांगलीच धावपळ होत आहे.
डांबरीकरणात मास्टिक हे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. डांबराचे तापमान १८० ते २०० डिग्रीपर्यंत असते. त्याचा सेट होण्याचा कालावधी अतिशय कमी आहे. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले तेथे चांगला परिणाम दिसला आहे.
वाहतूक पोलीसही खड्डे बुजवण्यात व्यस्त
पावसाने हलकी उसंत घेतल्याने ठाणे महापालिका क्षेत्रातील खड्डे भरण्याचे काम यंत्रणेने हाती घेतले आहे. खड्डे बुजवण्याचे काम संथगतीने सुरु असून मास्टिक पद्धतीने खड्डे भरले जात आहेत. मात्र इतर यंत्रणांवर अवलंबून न राहता वेळेची बचत आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले असून वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवा मोहीम हाती घेतली आहे