आकर्षक बस-विश्रांती थांबे शहराचे सौंदर्य खुलवणार

ओवळा-माजिवडे मतदारसंघात १०० थांब्यांसाठी १० कोटी

आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना

ठाणे: ओवळा-माजिवडे विधानसभा मतदारसंघात आकर्षक बस थांबे आणि ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी विश्रांती कट्टे उभारण्यासाठी जागा महापालिकेकडून निश्चित करण्यात आल्या असून १०० ठिकाणी आकर्षक आराखडे असलेले व लक्ष वेधून घेतील असे विद्यार्थी थांबे, बस थांबे आणि विश्रांती कट्टे बसवले जाणार आहेत. पुढील महिन्यापासून हे थांबे बसविण्याचे काम सुरु केले जाणार आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या १० कोटी इतक्या आमदार निधीतून हे काम सुरु होत आहे. लवकरात लवकर सर्व १०० ठिकाणी हे आकर्षक बस थांबे आणि विश्रांती कट्टे बसवले जातील, असे सरनाईक यांच्याकडून सांगण्यात आले.

वैविध्यपूर्ण आणि विविध आकारात, लक्षवेधी असे हे बस थांबे शहराच्या सौंदर्यात भर टाकणार आहेत. ठाणे शहरामध्ये पहिल्यांदा हे काम होत असून हे बस स्टॉप, विश्रांती कट्टे नागरिकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील अशा पद्धतीने त्याचे डिजाईन तयार केले गेले आहे, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

बस, रिक्षा, मेट्रो याच्या प्रतिकृतीमध्ये तसेच विविध डिजाईनमध्ये बस थांबे असतील. रेडिओ, रेल्वे, मेट्रो यांच्या आकारातील बस थांबे तर कुठे संत्र-सफरचंद अशा फळांच्या आकारातील बस थांबे, विद्यार्थ्यांना आकर्षून घेतील असे विद्यार्थी थांबे-विश्रांती कट्टे यांचे डिजाईन तयार आहेत.

ओवळा-माजिवडे विधानसभा मतदारसंघात ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिका मिळून १०० ठिकाणी हे थांबे बसवले जातील व त्यासाठी जागांची निश्चिती महापालिकेने केली आहे. पुढील महिन्यात कामाची सुरुवात होऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे आमदार सरनाईक यांनी माहिती देताना म्हणाले.

अनेकदा आमदार निधीतून जी कामे केली जातात, त्याची पुढच्या काळात देखभाल-दुरुस्ती महापालिकेकडून वेळेत होत नाही. त्यामुळे हे बस थांबे आणि विश्रांती कट्टे उभारल्यानंतर त्यांची वेळोवेळी निगा राखली जावी यासाठी त्या बस थांब्यांवर जाहिरात करण्याचा अधिकार एखाद्या संस्थेला देऊन त्यांच्याकडून त्याची देखभाल आणि निगा करून घेतली जाणार आहे.

बस थांबे आणि विश्रांती कट्ट्यावर तीन फूट जागेत जाहिरात करण्याचा अधिकार त्या संस्थेला किंवा ठेकेदाराला देण्यात येईल. त्या पैशातून त्याने बस थांबे आणि कट्ट्यांची देखभाल-दुरुस्ती करायची, अशी कल्पनाही आ.सरनाईक यांनी मांडली.