सदनिका हस्तांतरासाठी सहाय्यक आयुक्तांनी मागितली लाच?

माजी महापौरांकडून आयुक्तांकडे सत्यप्रतिज्ञापत्र सादर

ठाणे: रस्ता रुंदीकरणात बाधित असलेल्या बाधितांना एसआरएमधील सदनिका देण्यासाठी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी आपल्या स्वीय सहायकाकडून पाच लाख रुपये मागितले असल्याचा गंभीर आरोप अशोक वैती यांनी केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील सत्य प्रतिज्ञापत्रही वैती यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सादर केले आहे. अक्षय गुडदे यांना निलंबित करून तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी वैती यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील काजुवाडी प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी महापौर अशोक वैती यांच्या प्रभागातील रस्तारुंदीकरणात बाधित झालेल्या नागरीकाला त्या बांधकामाच्या बदल्यात सदनिका उपलब्ध करुन देण्याबाबत स्थावर मालमत्ता विभागाकडे विनंती अर्ज केला होता. तत्कालीन आयुक्तांनी २०१९ साली संबंधित बाधिताला दोन सदनिका हस्तांतरीत करण्यास मान्यता दिली होती. तरीही सहायक आयुक्त गुडदे यांनी, ४० लाखांची सदनिका हवी असेल तर आपणास पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आपले स्वीय सहायक यांच्याकडे केली असल्याचा आरोप अशोक वैती यांनी केला आहे. तर यासंदर्भात त्यांनी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आयुक्तांना सत्य प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे.

आयुक्तांची मान्यता असूनही तसेच वारंवार पाठपुरावा करूनही अक्षय गुडदे हे काम करत नव्हते. या संदर्भात कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे का? अशी विचारणा देखील गुडदे यांना आपण केली होती. मात्र हे काम करण्यासाठी त्यांनी आपले स्वीय सहायक यांच्याकडून पैसे मागितले असल्याचा आरोप वैती यांनी केला आहे. स्थावर मालमत्ता विभागाचा पदभार देखील गुडदे यांच्याकडे आहे. गुडदे यांच्या विरोधात दिव्यातील अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी देखील आहेत. तत्कालीन अभियंता विश्वास भसे यांच्याबाबतही अशा प्रकारे सत्य प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. तेव्हा त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात आली होती, असे वैती यांनी सांगितले. त्यामुळे पालिका आयुक्तांनी गुडदे यांना निलंबित करून त्यांची लाचलुचपत विरोधी पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी वैती यांनी केली आहे. यासंदर्भात दिव्याचे सहायक आयुक्त यांच्याशी संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात नंतर उत्तर देईन, असे सांगितले. एका पथनिर्देशित अधिकाऱ्यावर एवढा मोठा गंभीर आरोप केले गेला असल्याने महापालिका वर्तुळात मात्र उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.