राम नाम सुरु आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व…सनातन धर्म संपणार नाही

* दाजी पणशीकर यांचे प्रतिपादन
* ठाण्यात १३६ कारसेवकांचा सन्मान

ठाणे : जोपर्यंत राम नाम सुरु आहे तोपर्यंत, जगातून हिंदुत्व संपणार नाही, सनातन धर्म संपवता येणार नाही, असे परखड भाष्य ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, लेखक दाजी पणशीकर यांनी केले.

वर्ष १९९० आणि १९९२ या दोन्ही कारसेवांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील १३६ कारसेवकांचा जाहीर कौतुक-सन्मान सोहळा पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृहात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणुन दाजी पणशीकर बोलत होते. याप्रसंगी आ. संजय केळकर,आ. निरंजन डावखरे, मकरंद मुळे, ॲड. सुभाष काळे, कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रम्हे, भरत अनखिंडी व्यासपिठावर उपस्थित होते.

पणशीकर पुढे म्हणाले की आज आपण जे शिल्लक आहोत ती रामाची कृपा आहे. रामाच्या आधी आणि रामानंतर अनेक राजे होऊन गेले पण एकाचेही मंदिर झाले नाही. कारण सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष रामात होता. गेली ७० वर्षे मी भारतभर फिरलो पण असा मांगल्य योग इथे पाहायला मिळाला. अयोध्येला न जाता देखील इथेच कारसेवकांचे दर्शन झाले. या सर्व कारसेवक यांच्यामुळे आपण २२ तारखेला श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत आणि दुसरीकडे करोडो लोक रामभक्ती करत आहेत. रामासाठी रामभक्त सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत. ही शक्ती येते कुठून? काही अव्यक्त असल्याशिवाय व्यक्त होता येत नाही. रामाकडे वानरसैन्य होते. त्यांना फक्त आज्ञा कळत होती. तुमच्या आमच्यात जे सामर्थ्य आलेले आहे हे श्रीरामाचे सामर्थ्य आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आमदार संजय केळकर यांनी कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला. येत्या २२ तारखेला अयोध्येला राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, परंतु काही मंडळी हा मुहूर्त नसल्याचे सांगत अपशकून करत आहेत. परंतु या मुहूर्तावर कितीतरी हजारो वर्षे हे मंदिर टिकणार आहे असा टोला केळकर यांनी विरोध करणाऱ्यांना लगावला. हिंदू शक्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये पुन्हा कारसेवेसाठी जाण्याची संधी आली तर कितीतरी लोक यासाठी जातील तेवढी भावना शक्ती रामभक्तांमध्ये आहे. राम मंदिराबाबत गोंधळ निर्माण केला जात आहे. किमान रामाबाबत तरी हे करू नये, असे आवाहन करत हिंदुत्वाचा हुंकार या निमित्ताने जगाला दिसला आहे असे श्री.केळकर म्हणाले. आमदार निरंजन डावखरे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत विरोधकांना टोला लगावला.

यावेळी श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात बाबरी पतनाची लघुचित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर कारसेवक आ. संजय केळकर, एनटीपीसीचे संचालक विद्याधर वैशंपायन, संदीप लेले, ज्येष्ठ महिला लिलाताई जोशी, द्वारकानाथ भानुषाली, प्रविण देशपांडे, दयानंद नेने आदींचा मान्यवरांच्या हस्ते श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.

ॲड. सुभाष काळे यांनी प्रास्ताविक केले. वयोवृद्ध कारसेवक ओमप्रकाश शर्मा, निशा बर्वे, किशोर भावसार आदींनी अयोध्यावारीचे आपले अनुभव श्रोत्यांसमोर कथन केले.