शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना धमकी देणारा अटकेत

कल्याण : कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांना दोन दिवसापूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकाश बनसोडे (५४) या इसमाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

मानसिक बिघडलेली स्थिती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमधून आपण हा प्रकार केला आहे, अशी कबुली आरोपी प्रकाश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना दिली आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी प्रकाश बनसोडे या इसमाने फेसबुक समाज माध्यमातून एका मोठ्या लघुसंदेशाव्दारे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीपत्रात महेश यांना असलेल्या राजकीय पाठबळाचा उल्लेख करण्यात आला होता. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील गोळीबाराचे प्रकरण ताजे असताना, आता हे नवीन धमकी प्रकरण चर्चेला आले होते.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तातडीने या प्रकरणाचा तपास करून गुरुवारी धमकी देणाऱ्या प्रकाश कदम या इसमाला अटक केली होती. या इसमाची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये तो मद्यपी असल्याचे, त्याची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि त्याची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे आढळले. याउलट प्रकाश हा महेश गायकवाड यांचा फेसबुक मित्र असल्याचे तपासात पुढे आले. आपल्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमधून हा प्रकार घडला आहे, अशी कबुली प्रकाशने पोलिसांना दिली.

या प्रकारात तथ्य नसल्याचे दिसून आल्यावर त्याला योग्य ती समज देऊन पोलिसांनी त्याची सुटका केली. महेश गायकवाड यांनाही या प्रकरणाची पोलिसांनी माहिती दिली आहे.