अमली पदार्थाची निर्मिती करुन विकणा-यास अटक

५६ लाखांचा अमली पदार्थ जप्त

ठाणे : अमली पदार्थाची निर्मिती करून विक्री करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य तसेच तब्बल 55 लाख 73 हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणा-यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ठाणे शहर गुन्हे शाखेतंर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली.

28 डिसेंबर रोजी जयेश कांबळे उर्फ गोलू (25) आणि विघ्नेश शेळके उर्फ विघ्नया (28) यांना एकूण 78.8 ग्रॅम एमडी अंमली पदार्थासह ताब्यात घेतले होते आणि त्यांच्याविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यांना एमडी हा अंमली पदार्थ पुरवणा-या अहमद शेख उर्फ अकबर खाऊ (41) आणि शब्बीर अब्दुल करीम शेख (44) यांना 5 जानेवारी 24 रोजी वसई चिंचोटीहून अटक केली होती. त्यावेळी आरोपींकडून 26 ग्रॅम एमडी पदार्थ व चार किलो 850 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला होता.

मोहम्मद अन्सारीला कोपरी विरार पूर्वहून 18 जानेवारीला अटक झाली होती. मोहम्मद रहीस कुर्ला येथे राहणारा असून आमिर खान हा एमडी अंमली पदार्थ पूरवत असल्याबाबत माहिती दिल्यामुळे मोहम्मद अमीर खान कुर्ला याला 29 जानेवारी 24 रोजी अटक केली. अटक आरोपी मोहम्मदने त्याच्या ओळखीचा मनोज पाटील उर्फ बाळा ही व्यक्ती एमडी अमली पदार्थ पुरवत असल्याचे सांगून गुजरातमध्ये एमडी अमली पदार्थांची तस्करीमुळे अटक झाल्याचेही सांगितले. मनोज पाटील हा यात ‘मास्टर माइंड’ आहे.

मनोज पाटील उर्फ बाळा गुजरात येथे न्यायबंदी असताना मार्च 23 मध्ये पॅरोलवर आल्यानंतर परत कारागृहात हजर नव्हता. तो पळून गेला असल्याची माहिती मिळाली होती. मनोज पाटील हा कुठल्याही प्रकारे मोबाईल कॉल न करता इंटरनेट डोंगलचा वापर करून व्हाट्सअप कॉलद्वारे संपर्क करत असल्यामुळे तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करून मनोज उर्फ बाळा पाटील या आरोपीला खालापूर येथून अटक केली. तसेच दिनेश म्हात्रे यालाही अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे आणि सह-पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, सहाय्यक आयुक्त (प्रतिबंध गुन्हे) इंद्रजीत कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करण्यात आली.

गुन्हे शाखा अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे, सहाय्यक निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, उपनिरीक्षक दीपेश किणी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन परब, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम यांच्यासह सर्वश्री पोलीस हवालदार विक्रांत पालांडे, हरीश तावडे, अभिजीत मोरे, अभिजीत वासरवाड, हुसेन तडवी, महेश साबळे, संदीप भांगरे, हेमंत महाले आणि पोलीस नाईक अनुप राक्षे, यांच्यासह महिला पोलीस हवालदार शिल्पा कसबे, पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे.