अनधिकृत बांधकामे भोवली; लिपिकांच्या बदल्या

ठाणे: अनधिकृत बांधकामे प्रकरणी पालिकेच्या उथळसर, दिवा, मुंब्रा आणि लोकमान्य-सावरकर नगर या प्रभाग समितीतील सात लिपिकांची बदली करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेत वर्षानुवर्षे एकाच जागेवर राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चिकटून बसलेल्या वरिष्ठ लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पालिका मुख्यालयासह प्रभाग समितीमध्ये लिपिक पदावर कर्मचारी कार्यरत आहेत. यातील एकूण सात लिपिक तर एक बिगारी यांची बदली करण्यात आली आहे.

ठाणे पालिका आयुक्त अभिजित बागर यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, पालिका मुख्यालयातील मुख्याधिकाऱ्यांकडे असणारे अतिरिक्त पदभार काढून ते इतरांना देण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे ‘क्रीम पोस्टिंग’वर असलेल्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असताना पालिका प्रशासनाने आपला मोर्चा लिपीकाकडे वळवला आहे.

ठाणे महापालिकेत १२ ते १५ वर्षे एकाच खात्यात काम करणारे विविध विभागात अनेक लिपिक आणि वरिष्ठ लिपिक आहेत. राजकीय नेत्यांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने हे लिपिक कार्यरत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशा लिपिकांचा बदल्या करण्यात आल्या असून अनधिकृत बांधकामामुळे बदलीचा निर्णय घेऊन एक प्रकारे राजकीय नेत्यांना धक्का दिला असल्याची चर्चा सुरू आहे.