अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने सादर केलेल्या आराखड्याला नुकतीच पुरातत्व खात्याची परवानगी दिल्याने प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण शक्य होणार आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या महाशिवरात्रिच्या निमित्ताने आणि शिवमंदिर फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
प्राचीन शिवमंदिराला नवे रूप देण्यासाठी अंदाजे १३८ कोटी रुपयांच्या आराखड्यातील १२५ कोटींच्या विकास कामांना लवकरच सुरूवात होणार आहे, शिवमंदिराजवळून वाहणारी वालधुनी नदी किनारी घाट, जलकुंड सुशोभीकरण, भक्तनिवास, ऍम्पी थिएटर अशा विविध कामांचा त्यात अंतर्भाव असल्याने मंदिर परिसराला नवे रुप प्राप्त होणार आहे.
स्थापत्य वास्तूकलेचा उत्तम नमुना शिवमंदिराच्या रूपाने पाहता येतो. धार्मिकदृष्ट्या शिवमंदिराला मोठे महत्व आहे. वालधुनी नदीच्या किनारी असलेल्या या मंदिराचे आणि परिसराचे रूप पालटण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. कोरोनाचा दोन वर्षांचा संकटकाळ वगळता गेल्या काही वर्षांपासून महाशिवरात्रीच्या वेळी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचेही आयोजन केले होते. यंदाही फेस्टिव्हलच्या दृष्टीने हलचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवमंदिराच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्यात आला होता. खासदार डॉ. शिंदे यांनी यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला होता. या सुशोभीकरण कामासाठी भारतीय पुरातत्व खात्याची पूर्वपरवानगी आवश्यक होती.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने खात्याशी त्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यासंदर्भात निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने नुकतीच शिवमंदिर परिसरातील १०० मीटर अंतरावरील सुशोभीकरण आणि दुरूस्तीच्या कामाला परवानगी देण्यात आल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. पुरातत्व खात्याच्या परवानगीमुळे आराखड्यातील कामांच्या निविदा प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात १२५ कोटींच्या कामांना गती मिळणार असल्याने शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्प मार्गी लागणार आहे.
शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीचा काठ घाट स्वरूपात विकसीत केला जाणार आहे. त्यासाठी 40 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. साडे 14 कोटी खर्चून भक्तनिवासाचीही उभारणी केली जाणार आहे. सहा कोटी रूपयांच्या खर्चातून ऍम्पी थिएटर, सोबतच प्रदर्शन गृह, कुंडांचे सुशोभीकरणही केले जाणार आहे.