ठाणे: हजेरीसाठी आय स्कॅनिंग पद्धत यशस्वी झाल्यानंतर पाहणी दौर्याच्या नावाने फिरतीवर असलेल्या वरिष्ठ अधिकार्यांपासून अभियंत्यांसाठी एक अॅप विकसित करून त्यांच्यावर पाळत ठेवली जाणार आहे. त्यामुळे पालिका अधिकारी-कर्मचार्यांना यापुढे प्रत्येक मिनिटाचा हिशोब द्यावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील १५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेची शिस्त लागावी, यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी इलेक्ट्रॉनिक बायोमेट्रिक पद्धत सुरू केली. मुख्यालयाच्या कामकाजाची वेळ सकाळी दहा वाजता सुरू होत असल्याने किमान साडे नऊ ते पावणे दहापर्यंत या आय स्कॅनिंगवर हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कर्मचार्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळांचे मॉनिटरिंग करण्यासाठी विशेष प्रणाली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी कानाडोळा केला, पण त्यानंतर थेट कारवाईला सुरुवात झाल्याने ९५ टक्क्याहून अधिक कर्मचारी वेळेवर कामावर येऊ लागले आहेत. पालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांमध्येही लवकच आय स्कॅनिंग मशिन लागणार आहे. याचा सर्वाधिक फायदा रुग्णालय व्यवस्थापनाला होणार आहे.
काही अधिकारी पहाणी दौऱ्याच्या नावाने उशीरा येत असल्याचेही आढळून आले आहे. त्यांच्यासाठीही लवकच नवीन अॅप तयार करण्यात येत आहे. या अॅपवर ट्रॅकर स्टिस्टम असणार आहे. त्यामुळे अधिकारी, अभियंते कुठल्या फिरतीवर आहेत, किती वाजता पोहचले, किती वाजता तेथून निघाले याची माहिती मुख्यालयाच्या डॅशबोर्डवर मिळणार आहे.