एमटीडीसीच्या महादर्शन पथकाने जाणून घेतली माहिती
अंबरनाथ : अंबरनाथ येथील शिवमंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात सुमारे १०० कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येणार असून मंदिर परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे, त्यासाठी लागणाऱ्या परवानगीसाठी पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा सुरु आहे. परवानगी लवकरच मिळून विकास कामे सुरु होतील, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने सुरु असलेल्या महादर्शन उपक्रमांतर्गत एका विशेष पथकाने आज रविवार १९ जून रोजी अंबरनाथच्या शिवमंदिर परिसराला भेट देऊन नियोजित सुशोभीकरणाबाबतची माहिती जाणून घेतली. भटकंती फेम मिलिंद गुणाजी, सिने अभिनेते दलिप ताहील, हरविंदर पाल मेहता, कुलदीप सिंग, डॉ. रविराज अहिरराव, नितीन रविंदर आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता. त्याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांनी शिवमंदिराचा इतिहास, आणि शिवमंदिर विकास प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, सुनील चौधरी, उप नगराध्यक्ष अब्दुल शेख, पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
शिवमंदिराबाबत देशाप्रमाणे परदेशातही त्याचे महत्व आणि ओळख व्हावी यासाठी गेल्या सहा वर्षांपासून शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. आता कामाने वेग घेतला आहे. याशिवाय शिवमंदिर आर्ट फेस्टिवलद्वारे आघाडीचे कलावंत याठिकाणी येऊन गेले आहेत. ९६० वर्षांपूर्वीच्या शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर परिसरात काळ्या पाषाणाचा वापर करून परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी २० कोटींचा निधी नगरपालिकेला प्राप्त प्राप्त झाला आहे.
मंदिराच्या संरक्षक भिंतीपासून १०० मीटरपर्यंत असणारी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा आणि १०० मीटरच्या पुढे असणाऱ्या बांधकामाचा नकाशा १९ जानेवारी २०२२ रोजी पुरातत्व खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. प्रकल्पासाठी अंदाजे १३५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मंदिर परिसरात मत्सालय, बस स्टॅण्ड आणि पार्किंगची सुविधा, खेळाचे मैदाने आणि बगीचा यासारख्या विविध सुविधांचा अंतर्भाव आहे.
सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाली आहे . पुरातत्व खात्याची परवानगी आवश्यक असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून त्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरच परवानगी मिळेल आणि विकास कामे सुरु होतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.