‘महारेरा’च्या अध्यक्षपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती

ठाणे : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात ‘महारेरा’च्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची वर्णी लावली आहे. ३० एप्रिल २०२३ रोजी सौैनिक यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे स्वीकारली होती.

राज्याच्या गृहनिर्माण विभागाने मंगळवारी सौनिक यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. विद्यमान अध्यक्ष अजोय मेहता यांची मुदत २० सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त होत आहे. ही मुदत संपल्यानंतर सौनिक आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. मेहता यांची मुदत संपण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र दोन महिन्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता काळात राज्य सरकारला कोणत्याही नेमणुका आणि बदल्या करता येत नाहीत. त्यामुळे सरकारने दोन महिने आधीच सौैनिक यांची नियुक्तीचे आदेश काढून त्यांचा मार्ग खुला केला आहे.