ठाणे : ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे आम्हीच शिष्य असल्याचे दाखविण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. असे असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या फलकांवर आनंद दिघे यांचे छायाचित्र लावण्यात आल्याने ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
डॉ. आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक पहिल्यांदाच शहरभर लावल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर आनंद दिघे यांचे आम्हीच शिष्य असल्याचे दाखवण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार चढाओढ सुरू आहे. असे असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या फलकावर आनंद दिघे यांचे छायाचित्र झळकले आहे. आनंद दिघे यांचे इतर पक्षातील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध होते. त्याकाळी जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे काम करीत होते. आनंद दिघे यांच्याशी चांगले संबंध असले तरी त्यांनी त्यांचा फोटो या आधी कधी फलकावर लावल्याचे दिसून आले नव्हते. परंतु यंदा पहिल्यांदाच आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करणारे फलक लावले असून ठाणे शहर, राबोडी, कळवा भागात लावण्यात आलेल्या या फलकांमुळे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळाला लावत पक्ष प्रवेशाची तयारी सुरू केली असून यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांनी हे फलक लावले तर नाहीत ना, अशी चर्चा शहरात यानिमित्ताने सुरू झाली आहे.