बोरिवडे मैदानावर होणार अद्ययावत क्रिडा संकुल

ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून घोडबंदर परिसरातील बोरिवडे येथील महानगरपालिकेच्या २० एकरवर असलेल्या मैदानाच्या आरक्षित भुखंडावर अद्ययावत क्रिडा संकुल व सिथेंटिक ट्रॅक उभारण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील क्रिडापटू शहरामध्ये सिथेंटिक ट्रॅक असावा, अशी मागणी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांच्याकडे करीत होते. त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्यातर्फे ७५ कोटी क्रिडा संकुल उभारण्यासाठी मंजूर केलेले असून त्याचा शासकिय आदेश काढण्यात आलेला आहे.

बोरीवडे मैदानाच्या जागेच्या सभोवताली कुंपण भिंत, सुसज्ज प्रवेशद्वार त्याचबरोबर क्रिडा संकुलासाठी तळ अधिक एक मजल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. या क्रिडा संकुलामध्ये इनडोअर क्रिकेटबरोबरच हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅटमिंटन, स्कॉश कोर्ट, मल्लखांब त्याचबरोबर कबड्डी व कुस्तीसाठी मॅटचाही वापर होणार आहे. हे दोन्ही खेळ मातीत खेळण्यासाठी व मॅटवर खेळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलेले आहे.

मुंबईतील बी.के.सी. येथील एम.सी.ए. क्लबच्या धर्तीवर विविध इनडोअर खेळ खेळविले जाणार असून भविष्यामध्ये नामवंत प्रशिक्षकांची याठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक अँथलेटिक्स खेळाडू ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सिथेंटिक ट्रॅक नसल्यामुळे त्यांचा सराव व्यवस्थित होत नसल्यामुळे ते सरावासाठी मुंबईतील सिथेंटिक ट्रॅकवर जात असतात. तेथे जाण्यासाठी त्यांचा प्रवासामध्ये ४ ते ५ तासांचा वेळ जात असल्यामुळे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये सिथेंटिक ट्रॅक करावा अशी मागणी क्रिडापटू वारंवार आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे करीत होते. आता त्यांच्या मागणीला पुर्णविराम मिळाला असून पुढील महिन्यात या कामाला सुरूवात होणार आहे.

बोरीवडे येथील या मैदानावर महानगरपालिकेच्या वतीने पी.पी.पी. तत्वावर बी.के.सी. येथील एम.सी.ए.च्या धर्तीवर क्रिकेट क्लब व्हावा, अशी मागणी नागरिक व क्रिडापट्टू यांच्याकडून होत होती. त्यानुसार शहर विकास विभागाने सूचना-हरकती मागविल्या होत्या. त्यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे विनंती करून घोडबंदर रोड येथे दिवसेंदिवस वस्ती वाढत असून हे एकमेव मोठे मैदान असल्याने सदरचा प्रकल्प मोघरपाडा येथील जागेवर हलविण्याची विनंती केली असता आयुक्तांनी विनंती मान्य केली असून मोघरपाडा येथे भविष्यामध्ये एमएमआरडीएच्या जागेवर क्लब व क्रिकेट ॲकेडमी बनविण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाढत्या लोकसंख्येप्रमाणे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे क्रिडा संकुल व सिथेंटिक ट्रॅक होत असल्याने क्रिडापटू आनंदित आहेत.