आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची ठाणेकरांना संधी

* दादोजी कोंडदेव स्टेडियमजवळ निवासस्थान आणि पार्किंग
* ठामपाने आरक्षण बदलाबाबत मागवल्या हरकती

ठाणे: दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे निवास आणि पार्किंगची सोय करण्यात येणार असल्यामुळे ठाण्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी ठाणेकरांना लवकरच मिळणार आहे.

ठाणेकरांसाठी दादोजी कोंडादेव स्टेडियम बनविण्यात आले असले तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंना निवास आणि पार्किंगची सुविधा नसल्याने या स्टेडियमकडे नामांकित संघ आणि खेळाडूंनी पाठ फिरवली होती. काही महिन्यांपूर्वी या स्टेडियमचे महापालिकेने रुपडे बदलले. मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आले तसेच दिवस-रात्र क्रिकेटचे सामने व्हावेत यासाठी फ्लड लाइटची सोय करण्यात आल्यामुळे आयपीएलचे संघ सराव करण्यासाठी स्टेडियमला पसंती देतात, मात्र निवासाची सोय नसल्याने ते सर्वजण मुंबई येथे जातात.

खेळाडूंची ही अडचण लक्षात घेऊन महापालिकेने स्टेडियमच्या बाजूला असलेल्या ४० हजार चौरस मिटच्या भूखंडावर एक इमारत बांधून खेळाडूंच्या निवासाची सोय करण्याची योजना तयार केली आहे, परंतु स्टेडियमच्या भूखंडाचे आरक्षण असलेल्या जागेवर इमारत प्रस्ताव मंजूर करता येत नसल्याने आरक्षण बदलाबाबत हरकत आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. या इमारतीच्या जागेतून थेट पॅव्हेलियनमध्ये जाता येणार आहे. त्याचबरोबर विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या भूखंडावर पार्किंगचे आरक्षण आहे. त्या ठिकाणी प्रशस्त पार्किंग खेळाडूंकरिता निर्माण करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

ज्या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट आहे, त्या जागेवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभे करण्यात येणार आहे. या परिसरात देखिल मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा असल्याने बॅडमिंटनबरोबर इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळले जातील, त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळेल, असा विश्वास त्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.