दिव्यात उभा राहणार शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

ठाणे : दिवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतरच या चौकात पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा हे महत्वाचे जंक्शन आहे. या जंक्शनवरून दिवसभरात लाखो प्रवासी ये-जा करतात. गेल्या काही वर्षांत दिवा शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या भागात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही भव्य पुतळा नाही. दिवा स्टेशन रोड, आगासन रोड व दिवा स्टेशनला जोडणारा शिळ-दिवा रोड या तीन मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या दिवा चौक येथे आवश्यक चौथरा बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचा मानस प्रशासनाचा आहे. लवकरच शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर पुतळा उभारण्यात येणार आहे.