खारघरमधील मृतांमध्ये कळव्यातील दोन महिला

परिसरात शोककळा

ठाणे: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी घडली. यात कळव्यातील दोन श्री सदस्यांचा समावेश होता. या घटनेने कळवा परिसरावर शोककळा पसरली आहे.

भीमा साळवी (५८) आणि पुष्पा गायकर (६४) अशी नावे मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांची आहेत. या दोघी आणि इतर तीन महिला श्री सदस्य काल आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी पहाटे पाच वाजता ठाणे रेल्वे स्टेशन येथून गेल्या होत्या. इतर तीन महिला पहिली लोकल पकडून गेल्याने त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी जागा मिळाली होती तर या दोन महिला थोड्या उशिराने दुसरी लोकल पकडून गेल्याने त्यांना मागची जागा मिळाली होती. या सर्व महिला कळवा येथे मागील अनेक वर्षे बैठकीला जात होत्या. अनेकदा कार्यक्रमाकरिता गेल्या होत्या.
मागील दोन वर्षे आप्पा स्वारी यांचे दर्शन झाले नव्हते, त्यामुळे दर्शनाच्या ओढीने त्या गेल्या होत्या.

वयस्कर, व्याधीग्रस्त श्री सदस्यांनी सोहळ्याला येऊ नये अशी सूचना करण्यात आली होती, परंतु मागील दोन वर्षे स्वारीचे दर्शन झाले नसल्याने या दर्शनाच्या ओढीने गेल्याचे दिनेश साळवी म्हणाले. ते पुढे म्हणाले की आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर अपार श्रद्धा होती. त्या बैठकीला नित्यनेमाने जात होत्या.

श्रीमती भीमा साळवी यांच्या पश्चात पती, मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. पुष्प गायकर या देखील आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री सदस्य होत्या. त्यांचीही अपार श्रद्धा होती. या दोन महिलांच्या मृत्यूने कळवा परिसरात शोककळा पसरली आहे.

श्री सेवकांचा मृत्यू माझ्यासाठी क्लेशदायक-धर्माधिकारी

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सेवकांचा उष्माघाताने झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक आहे. या घटनेवर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.

आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले.

झालेला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दुखवटा पाळला आहे. पुढील दोन दिवस ते कोणालाही भेटणार नाहीत. रेवदंडा येथील निवासस्थानाबाहेर पुरस्कार सोहळ्यानिमित्त रांगोळी, फुलांची सजावट मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. मात्र, ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे फुलांची सजावट रांगोळी फुलांची सजावट काढण्यात आली आहे.

महेश गायकर (42) रा.वडाळा-मुंबई, जयश्री पाटील (54) रा. म्हसळा- रायगड, मंजुषा भोंबंडे (51) रा. गिरगाव-मुंबई, स्वप्निल केणी (30) रा. विरार, तुळशीराम वांगड (58) रा. जव्हार-पालघर, कलावती वायचळ (46) रा. सोलापूर, भीमा साळवी (58) रा. कळवा-ठाणे, सविता पवार (42) रा. मुंबई, पुष्पा गायकर (64) रा. कळवा-ठाणे, वंदना पाटील (62) रा. करंजाडे आणि एक अनोळखी महिला (50 ते 55 वर्ष) अशा 11 मृतदेहांपैकी दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.