अंबरनाथकरांची पाणीसमस्या सुटणार

२५८ कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील नागरिकांची पाणी समस्या लवकरच सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमृत योजनेतील टप्पा दोनच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.

अंबरनाथमधील वाढते शहरीकरण तसेच झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये याकरिता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मागणीनुसार अमृत योजना टप्पा दोनच्या प्रकल्पास हिवाळी अधिवेशनात मान्यता देण्यात आली होती, परंतु प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रकल्प प्रलंबित होता. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी या प्रकल्पाचा पाणी पुरवठा खात्याच्या मंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा करून पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये हा मुद्दा लावून धरला होता.

अखेर केंद्र शासन पुरस्कृत अमृत टप्पा २.० अभियान अंतर्गत अंबरनाथ नगरपरिषदेच्या २५८.२९ कोटी रुपये प्रकल्प किमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेमधील विवरण पत्रात नमूद शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आल्याचे आमदार डॉ. किणीकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी आभार मानले आहेत.