अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण

काम बंद आंदोलन

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये होर्डिंगवरील कारवाईच्या मुद्द्यावरून झालेल्या बाचाबाचीत अंबरनाथ नगरपालिकेतील भांडार विभागप्रमुख सचिन गायकवाड यांना तक्रारदार प्रवीण गोसावी यांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून प्रशासकीय इमारतीबाहेर ठिय्या देऊन घटनेचा निषेध केला.

शासकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी अंबरनाथ पोलिस स्टेशनमध्ये प्रवीण गोसावी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत आणि अधिकृत मोठ्या आकाराच्या होर्डिंगवर कारवाईची मोहिम अंबरनाथ नगरपालिकेकडून राबवण्यात येत आहे. याच होर्डिंगच्या कारवाईवरून प्रवीण गोसावी हा पालिकेच्या भांडार विभागात आज गुरुवारी सकाळी जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी भांडार विभागप्रमुख सचिन गायकवाड आणि प्रवीण गोसावी यांच्यात शाब्दिक वाद सुरू असतांनाच प्रवीण गोसावी याने सचिन गायकवाड यांना मारहाण केली. यानंतर कार्यालयात उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद थांबवला. मारहाणीच्या घटनेनंतर प्रवीण गोसावी याने पालिकेतून काढता पाय घेतला.

सचिन गायकवाड यांना मारहाण झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर जमा होत दिवसभर कामबंद आंदोलन केले. सचिन गायकवाड यांनी या प्रकरणी अंबरनाथ पोलिस स्टेशनमध्ये प्रवीण गोसावी याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तक्रार करूनही पालिकेतील अधिकारी अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला विलंब करत होते. याबाबतचा जाब विचारण्यासाठी मी गेलो असता त्यातून झालेल्या वादावादीत सचिन गायकवाड माझा अंगावर धावून आल्याने मी केवळ प्रतिकार केला असून याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासावेत असे गोसावी याने सांगितले आहे.

पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना मारहाणीच्या घटनामध्ये वाढ होत असल्याने पालिकेतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.