ठाणे : आपणाला संविधानाने धर्मनिरपेक्ष तत्व दिले आहे. त्याचीच मोडतोड केली जात आहे. त्यामुळे जर संविधान वाचवायचे असेल तर आपले सरकार आले पाहिजे, असे प्रतिपादन मुंब्रा-कळवा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केले.
कौसा तलाव येथे सोमवारी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड बोलत होते. या प्रसंगी मंचावर शमीम खान, शानू पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या देशात आणि राज्यात द्वेष पसरविला जात आहे. धार्मिक विषमता पसरवून विशिष्ट धर्माच्या लोकांवर हल्ले केले जात आहेत. धार्मिक द्वेष न पसरविता समता प्रस्थापित करण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला संविधान दिले आहे. मात्र, या संविधानाला हटविण्याचा डाव आखला जात आहे. त्याविरोधात आपण लढलं पाहिजे. आपले सरकार आले तर संविधान वाचेल अन् पर्यायाने धार्मिक एकता या देशात नांदेल.
अजित पवार यांच्यावर टीका करताना डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, मोदींनी सत्तर हजार कोटीचा विषय काढताच तिसऱ्या दिवशीच अजित पवार पळून गेले. पळून जाताना त्यांनी पवारसाहेबांचे घड्याळही चोरले. या चोरांना धडा शिकवण्यासाठी तुतारी समोरील बटन दाबणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले.
महिलांना दीड हजार रूपये देऊन उपकाराची भाषा केली जात आहे. पण, दीड हजार देऊन चार हजार काढले जात आहेत. मीठापासून तेलापर्यंत महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यावर न बोलणारे हे सरकार आपणाला घालवायचे आहे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.