महायुतीचे सर्व उमेदवार विजयी; मविआला धक्का !

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ उमेदवार देण्यात आल्याने कोणाला धक्का बसणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आज, शुक्रवारी मतदान झाले तसेच तासाभरात मतमोजणी देखील पार पडली. विधानसभेच्या २८८पैकी २७४ सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले. अंतिम निकालानुसार भाजपचे परिणय फुके, पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, शिंदे गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले.

भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार निवडून येतील एवढी मते त्यांच्याकडे होती. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांना काही मतांची जुळजुळव करावी लागणार होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु आपले आमदार एकसंध ठेवण्यात एकनाश शिंदे आणि अजित पवार यांना यश मिळाले. विधान परिषद निवडणुकीत शरद पवार हे अजित पवार यांच्याकडील आमदारांची मते खेचून त्यांना धक्का देतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन अजित पवार यांनी निवडणुकीचे परफेक्ट नियोजन केले, त्याचा परिपाक अजित पवार यांचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यात झाला. दुसरीकडे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर सर्वपक्षीय संबंधाच्या जोरावर आमदार बनले. काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव यांनीही विजय संपादन केला. मात्र काँग्रेस आमदारांची ७ ते ८ मते फुटल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीत देखील काँग्रेसची काही मते फुटली होती.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. मात्र आश्चर्य म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यक मते नसतानाही ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या संबंधाच्या जोरावर विजय मिळवला. लोकसभा निकालामुळे निराशेच्या गर्तेत असलेल्या महायुतीला विधान परिषदेच्या निकालाने पुन्हा विजयाची चव चाखायला मिळाली आहे. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीची मोहीम यावेळीही फत्ते केली. कारण काँग्रेसची सात ते आठ मते फुटल्याचे निकालातून समोर येत आहे.