ठाण्यात अजित पवार गटाने कंबर कसली

नजीब मुल्ला यांच्या बैठका सुरू

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाण्यातील तरुण नेते नजीब मुल्ला हे आ.आव्हाड गटाच्या विरोधात कामाला लागले असून त्यांनी आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चेहरा असलेले श्री. मुल्ला हे अजित पवार यांच्या सोबत गेले. त्यामुळे ठाण्यात आ. आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असे चित्र दिसत आहे. आ.आव्हाड यांच्यासोबत माजी नगरसेवक असले तरी तरुण कार्यकर्ते मात्र श्री. मुल्ला यांच्याबरोबर असल्याचे चित्र आज दिसत होते. कळवा, मुंब्रा, वर्तकनगर, ठाणे शहर, कोपरी आणि घोडबंदर या भागातील तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या बैठकीला उपस्थित होते. श्री. मुल्ला यांनी त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले असता त्याला तरुण कार्यकर्त्यानी प्रतिसाद दिला. यावेळी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे कळते. २२ जुलै रोजी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय उघडण्यात येणार आहे. त्याबद्दल देखिल चर्चा करण्यात आली.
याबाबत श्री. मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आमचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधून निर्णय घेण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राष्ट्रवादी मजबूत करायची कार्यकर्त्यांना मोकळेपणाने चर्चा करता आली. या बैठकीत हम करे सो कायदा अशी वृत्ती कोणाचीही नाही, त्यामुळे कार्यकर्त्यानी विविध मुद्द्यावर आपले विचार मांडल्याचे श्री. मुल्ला म्हणाले