नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ३ च्या सेवा रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान अचानक पावसामुळे कोसळली. सुदैवाने याप्रसंगी वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु सदरची कमान हटविण्यास पालिका कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
दुपारी १२.३० च्या दरम्यान ऐरोलीत जोरदार पावसाने हजेरी घेतली असताना भारत बिजली येथील रेल्वे रुळालगत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान अचानक पावसामुळे कोसळली. घटना घडताच पालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस व रबाळे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरची कमान ही रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क केला असता संपर्क होत नव्हता. तसेच रेल्वे प्रशासनाचे कोणतेच अधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होताना दिसत नव्हते.
सदरची कमान हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यास सुरुवात केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी दिसून आली.