नवी मुंबई : नवी मुंबईतील सफाई कामगारांच्या समान काम समान वेतन या मागणीवर कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर नवी मुंबई मनपा आयुक्तांनी एक समिती नेमली होती. मात्र महानगर पालिकेने नेमलेल्या समितीने कामगारांना मिळणारे किमान वेतन हे समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे मिळणाऱ्या वेतनापेक्षा जास्त आहे, असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे सफाई कामगारांनी मनपाच्या या निष्कर्षाविरोधात आजपासून साखळी उपोषण पुकारले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगर पालिकेने २००७ साली स्वीकारलेल्या धोरणानुसार समान काम समान वेतन लागु करून २००७ साली नियुक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास आज रोजी मिळणारे वेतन तथाकथित कंत्राटी कामगारास मिळावे म्हणून समता समाज संघटनेतर्फे, मनपा तसेच शासन स्तरावर वारंवार मागणी करण्यात आली आहे. या मागणीला अनुसरून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी एक समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेश देऊनही कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याने अखेर सफाई कामगारही समता समाज संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी बेलापूर येथील नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.
यावेळी संघटनेचे शिष्टमंडळ मनपा नियुक्त समिती अध्यक्षांना भेटले. यावेळी महानगर पालिकेने नेमलेल्या समितीने कामगारांना मिळणारे किमान वेतन हे समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे मिळणाऱ्या वेतनापेक्षा जास्त असा निष्कर्ष काढला असल्याचे शिष्टमंडळाला दिसून आले. त्यामुळे मनपाने कामगारांच्या वेतनाबाबत काढलेल्या निष्कर्षाच्या निषेधार्थ उद्या शनिवार 28 डिसेंबर 2024 पासून समाज समता कामगार संघाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे, अशी माहिती मंगेश लाड यांनी दिली.