ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा किंचित वाढला आहे. आज १३७ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर २१६जण कोरोनामुक्त झाले आहेत. सुदैवाने आज एकही रूग्ण दगावला नाही.
महापालिका हद्दीत सर्वाधिक ६१ रुग्णांची भर माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात झाली आहे. २२ रूग्ण वर्तकनगर आणि १२जण उथळसर प्रभाग समिती परिसरात वाढले आहेत. प्रत्येकी नऊ रूग्ण वागळे आणि कळवा प्रभाग समितीमध्ये सापडले आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात आठ, दिवा येथे सात, लोकमान्य सावरकर नगरमध्ये पाच आणि सर्वात कमी एक रूग्ण मुंब्रा प्रभाग समिती भागात नोंदवला गेला आहे. तीन रुग्णांच्या घराचा पत्ता मिळू शकला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी २१६जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८८,३६२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी १,३१२जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने एकूण मृत्यूचा आकडा २,१३७ एवढा झाला आहे
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,०३१ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये १३७जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ७०,६७२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ९१,८११जण बाधित सापडले आहेत.