नवी मुंबई: गेल्या नऊ महिन्यांत नवी मुंबईत वायू आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या तीन हजारहून अधिक वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या आणि त्याचबरोबर रस्त्यावर वाहने देखील तेवढ्याच प्रमाणात धावत आहेत. शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले असताना आता पीयूसी नसलेल्या वाहनांचा धूर प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. सर्रास विनापीयूसी वाहने शहरात धावताना दिसून येत आहेत. या वाहनांमधून हायड्रोकार्बन, कार्बन मोनोक्साईड असे विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडले जातात. त्याला आळा घालण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट (पीयूसी) बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही शहरात पीयूसी प्रमाणपत्र तसेच वाहनांमधून विषारी वायू बाहेर सोडणारे वाहने आढळली आहेत. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३१७३ वाहनांवर कारवाई करत १०,६६,९०० रुपये दंड वसुली करण्यात आलेली आहे.
दरम्यान वाहन चालविताना वाहनांमधून किमान ५० डेसीबलपर्यंत आवाज नियमात असताना शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या बुलेटचा आवाज हा ८० ते ९० डेसीबल असतो. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये करण्यात येणारा बदल बेकायदा आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आवाजाचा उच्छाद थांबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कारवाई करण्यात येत असून एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यानच्या कालावधीत ४९३ वाहने तपासली असून त्यापैकी ११७ वाहने दोषी आढळली आहेत. यांच्यावर कारवाई करत ६० हजार रुपये दंड वसूली करण्यात आली आहे.