ठाणे: आयुक्तांच्या आदेशानंतर माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका हद्दीत सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकांविरोधातील मोहीम आता तीव्र करण्यात आली आहे. बाळकुम पाडा नंबर 3 जलाराम बाप्पा मंदिरा शेजारी सुरू असलेले फुटींगचे बांधकाम जेसीबी मशीनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. प्रभागात पदपथांवर सुरु असलेली अतिक्रमणेही निष्कासित करण्यात आली. अनधिकृत चाळींवरही कारवाई करण्यात येत असून ही मोहीम अशीच सुरु राहणार असल्याची माहिती प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
माजिवडे पुलाखालील बांधकामांकडे दुर्लक्ष
नाशिककडे जाणाऱ्या माजिवडे येथील पुलाखाली अनधिकृतपणे अनेक पक्के गाळे बांधण्यात आले आहेत. यावर कारवाई करण्याबाबत प्रभाग समिती दुर्लक्ष करत असल्याने आयुक्तांना याबाबत सहा तक्रार अर्ज देण्यात आले. त्यांनी निर्देश देवूनही माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील कारवाई करत नाहीत, मात्र झोपड्या आणि ठेल्यांवर तत्काळ कारवाई करतात, असा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे.