ठाणे: गेल्या नऊ महिन्यांमध्ये तब्बल सव्वा पाच हजार दुचाकीस्वारांवर कारवाई केली असल्याची माहिती ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे.
रस्त्याच्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. आणि त्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे एका अहवालात अधोरेखित झाले आहे. दुचाकी चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे बंधनकारक असतानादेखील अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट दुचाकी चालवत असतात. याबद्दल ठाणे प्रादेशिक परिवहन ‘अलर्ट मोड’ वर आले आहे. गेल्या नऊ महिन्यांत ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, शहापूर परिसराच्या भागातील तब्बल ५२५० विना-हेल्मेट दुचाकीस्वारांवर विभागाने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
भिवंडी, मीरा-भाईंदर, शहापूर या परिसरामध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने विना हेल्मेट दुचाकी चालवणा-या चालकांवर कारवाई करत असताना डिसेंबर महिन्यांत सर्वाधिक १७८२ चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. रस्ते अपघातांमध्ये ७० ते ८० टक्के प्रमाण दुचाकी आणि पादचारी यांचे आहे. हेल्मेट न घातल्यामुळे राज्यात ७,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. ही चिंताजनक बाब असून, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे, असे ‘आरटीओ‘ अधिका-यांचे स्पष्ट म्हणणे आहे, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
२५ विद्यार्थ्यांना हेल्मेट देऊन,‘अग्रदूत’ म्हणून कार्य
ठाणे पूर्व येथील के. सी. महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत रस्ते विकास, ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि एनजीओ यांच्या संयुक्त विभागाने २५ विद्यार्थ्यांना हेल्मेट देऊन, अग्रदूत म्हणून कार्य करण्याचे सांगितले आहे, असे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे यांनी रोहित काटकर सांगितले.