ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३०० डबेवाले विठुरायाच्या भेटीला

ठाणे : महाराष्ट्रातून ठिकठिकाणच्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत आणि अजूनही वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पोहचून ‘विठूराया’चे दर्शन घेण्याची आस मुंबई आणि ठाणे येथील डबेवाल्यांना लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमारे 300 डबेवाल्यांनाही अजूनही ‘वारी’चे वेध लागले आहेत.

डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधीही चुकलेली नाही. वारीला जाण्यासाठी ‘डबेवाला’ कामगारांनी त्यासाठीच दोन दिवसांची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे 17 व 18 जुलै २०२४ रोजी ‘डबे सेवा’ बंद असणार आहे, अशी माहिती ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.

ठाणे जिल्ह्यातून सुमारे 300 डबेवाले वारीसाठी गेले आहेत,अशी माहिती श्री.तळेकर यांनी दिली. 16 जुलै रोजी दिवसभर डबेवाल्यांनी काम केले आहे आणि ते रात्री वाहनाने पंढरपूरला रवाना होऊन पंढरपुरात पोहचतील. त्यांनी पूर्वनियोजन केल्यामुळे ठाणे आणि मुंबईतील डबेवाल्यांची गैरसोय होणार नाही. मात्र, कोणाही डबेवाल्यांची गैरसोय झाली तर, त्याबद्दल ‘मुंबई डबेवाला असोसिएशन’तर्फे तळेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.