आधिर झाले सारे; सबबी झाल्या उदंड!

पोलिसांतर्फे काही वार्षिक उपक्रम घेतले जात असतात. वाहतूक सुरक्षा या विषयावर सुरुवातीस एक आठवडा साचेबंद कार्यक्रम आयोजित केले जात असत. अशा कार्यक्रमांची लोकप्रियता वाढावी म्हणून सिने तारकांनाही अनेकदा पाचारण केल्याचा इतिहास आहे. एकदा तर बिग-बी अर्थात अमिताभ बच्चन यांनीही हजेरी लावली होती. अर्थात पोलिसांचा हेतू स्वच्छ असला तरी त्याचा म्हणावा तसा परिणाम साधला जात नाही, हे तितकेच कटू सत्य आहे. त्याबद्दल जनतेच्या मनात खदखदणारा असंतोष, काही उपयुक्त सूचना, तक्रारी वगैरेंची चर्चा होणे आवश्यक आहे. दुर्देवाने ज्या नागरिकाला सुरक्षिततेचा केंद्रबिंदू मानला जातो तो या उपक्रमांत फारसा सहभागी झालेला दिसत नाही. ही बाब वर्षानुवर्षे आम्ही वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणत आलो आहोत.

नवनियुक्त पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी उद्घाटन प्रसंगी मांडलेले विचार लक्षात घेता वाहतुक विभाग काही आमुलाग्र बदल करण्याच्या मन:स्थितीत आहे, असा अंदाज बांधायला हरकत नाही.
ठाण्यातील वाहतुकीला शिस्त राहिलेली नाही, असे वेगवेगळ्या प्रकारे पत्रकार मांडत असतात, सर्वसामान्यांच्या या व्यथेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. यामागे वाहतूक पोलिस विभागाचे अपुरे मनुष्यबळ हे प्रमुख कारण म्हणून सांगितले जाते. या सबबीच्या आधारे वर्षानुवर्षे ठाण्यातील वाहतुक सुरु आहे. मनुष्यबळ हे कारण मान्य केले तरी त्यावर मात कशी करता येईल याबाबत गांभीर्याने विचार झाला नाही. वाहनांची वाढती संख्या आणि प्रत्येक वाहनचालकाची वाहन हाकण्याची तऱ्हा यांमुळे गोंधळात भर पडते. समस्त वाहनचालकांना एका निश्चित शिस्तीच्या चौकटीत बांधले का जाऊ शकले नाही. उदाहरणार्थ वाहतूक कोंडीचे प्रमख कारण हे वाहनचालकाच्या अकारण अधिरतेत दडले आहे. चौकात येताना ब्रेक दाबून, अंदाज घेऊन, तो पार करावा इतके किमान भान आणि संयम ठाण्यात इतक्या वर्षात आपण आणू शकलो नाही. हे काम अमिताभ बच्चनने करुन दाखवावे हा बालिशपणा वाहतूक पोलिसांनी सांडायला हवा. वाहतूक सुरक्षा ही गंभीर बाब ‘ग्लॅमरस’ कारण्याची कल्पना कोणा अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून आली, त्यास 21 तोफांची सलामीच द्यायला हवी. आजही प्रत्येक चौकात पोलिसांनी आळीपाळीने (कमी आहेत म्हणून) वाहनचालकांना संयमाचे धडे दिले तर कोंडी फुटायला मदत होईल.

ठाण्याचे रस्ते रुंद झाले. उड्डाणपूलही आले, तरी वाहतूक कोंडी आणि सुरक्षितता यांवर इलाज सापडू नये. याची जबाबदारी वाहतूक शाखेइतकेच वाहनचालकांना घ्यावी लागेल. सुसंस्कृत असल्याचा दावा करायचा आणि वाहन हाकताना या सुसंस्कृतपणाला सोडचिठ्ठी द्यायची, हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे. ठाण्यातील नागरीकांची आरोग्य तपासणी केली तर केवळ ‘ट्रॅफिक कल्चर’ नसल्यामुळे निम्म्याहून अधिक लोक रक्तदाबाचे रुग्ण झाल्याचे आढळतील. वाहतूक सुरक्षिततेचे धडे गिरवण्याचे काम विद्यार्थी दशेत सुरु करुन पुढे तरूणांनी त्या चांगल्या सवयी अंगी बाळगायला हव्यात. परंतु खिशात पैसा खुळखुळू लागल्यामुळे वेगवान वाहने खरेदी करण्याकडे कल वाढू लागला. असेच काही तरुण शेअर रिक्षा चालवून अक्षरश: हैदोस घालत आहेत. वाहतूक पोलिसांनी चौका-चौकांत लावलेल्या कॅमेऱ्यांवर अशा बेधडक, बिनधास्त आणि बेजबाबदार वाहनचालकांवर अंकुश ठेवावा. तर आणि तरच हा उपक्रम परिणामकारक झाला असे म्हणता येईल. हेल्मेटमुळे वाहनचालकाची सुरक्षा साध्य होते, पण पादचाऱ्यांचे काय? श्री. डुंबरे यांच्याकडून वाहन हाकण्याच्या वर्तनात बदल घडवण्याची भव्य योजना आखली जावी ही अपेक्षा आहे.