उल्हासनगर : म्हारळ गावातील जलशुद्धीकरण केंद्रात काम सुरू असताना सुरक्षेच्या अनास्थेमुळे एका ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे बबलू कनोजिया या कामगाराचा ३० फूट खोल टाकीत कोसळून जागीच मृत्यू झाला. ठेकेदार कंपनीने सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली नसल्याचे समोर आले असून, या घटनेने कामगार सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर शहराच्या सीमेलगत असलेल्या म्हारळ एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रातील टाकी क्रमांक तीनच्या ब्रिजच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. या कामासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली होती. मात्र कामगारांनी कोणताही निर्देश न देता क्रेन चालकाने निष्काळजीपणे ब्रिज उचलला. या क्रेनचा जोराचा झटका लागल्याने बबलू कनोजिया हे कामगार संतुलन गमावून थेट ३० फूट खोल पाण्याच्या टाकीत कोसळले. तातडीने त्यांना वर काढण्यात आले, पण दुर्दैवाने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर काम ठेकेदारी कंपनीकडून सुरू होते. मात्र, या ठिकाणी कामगारांसाठी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपकरणे किंवा उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. ही ठेकेदार कंपनीची बेफिकिरीच या अपघातास कारणीभूत ठरली असल्याचे मत व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. क्रेन चालक आणि ठेकेदार कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.