समृद्धीवर अवतरला धबधबा; तर रस्त्याने धारण केले तलावाचे रूप

पावसाने केली ठेकदाराची पोलखोल

शहापूर : तालुक्यातील शहापूर-मुरबाड मार्गावरील कोळकवाडी येथे बांधलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलावरून पावसाचे पाणी थेट रस्त्याच्या मध्यभागी पडत असल्याने वाहनचालकांना पुलावरून पडणाऱ्या पाण्याला चुकवत प्रवास करावा लागत आहे. तर ५४८ या महामार्गावरील पॅकेज नंबर १६ मधील इंटरचेंज रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने या रस्त्याने तलावाचे रूप धारण केले आहे.यामुळे या मार्गावरून चारचाकी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.पर्यायाने येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील फेज क्रमांक १६ मधील कोळकवाडी टोलनाका येथील पुलावरील पाण्याला योग्य मार्ग न दिल्यामुळे पुलावरील पाणी थेट खालील रस्त्यावर पडत असल्याने येथे धबधबा आहे का अशी शंका येते. इंटरचेंज रस्ता समांतर न बनवल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे. मागील सहा महिन्यांपासून समृद्धी महामार्गाच्या फेज नंबर १६ मध्ये संथ गतीने काम सुरू आहे. मे.नवयुग इंजिनीअरिंग ठेकेदार कंपनीकडून याबाबत जाणीवपूर्वक चालढकल होत असल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता शहापूर आणि मुरबाडसह कर्जत, खोपोली, कल्याण, बदलापूर, माळशेज आदी तालुक्यांना आणि मुख्य शहरांना जोडला गेलेला असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते.

समृद्धी महामार्गाच्या फेज १६ मधील कोळकवाडी टोल नाक्याजवळील दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर साचणार्‍या पावसाच्या पाण्याची तसेच पुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याची समस्या तत्काळ दूर करावी अन्यथा या साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने मोठी जीवितहानी झाल्यास सदर कंपनीला जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिला.