धरण क्षेत्रावर कृपादृष्टी

बारवीमध्ये ४१टक्के आणि भातसामध्ये ४२ टक्के पाणी पातळी

ठाणे: यंदाच्या वर्षी जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पाणी कपातीची वेळ ओढवली होती, मात्र १ जुलैपासून जिल्ह्यातील शहरी भागासह धरणक्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील भातसा, बारवी आणि मध्य वैतरणा या धरणांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. गेल्या १५ दिवसांत दुप्पट पाणीसाठा या धरणांत झाला आहे.

मागील तीन ते चार दिवसांपासून ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या सातत्याने पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या पातळ्यांनी धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे नदी पात्राजवळील भागात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ ओढवली होती. त्यात धरण क्षेत्रातही पाऊस चांगला झाल्याने धरण पातळीतील आजच्या टक्केवारीतून दिसत आहे. यामध्ये बारवी धरणातील पाणी पातळी ४२.३४ टक्के तर भातसाची पाणी पातळी ४९.२५टक्के, धामणी ४५.०१ टक्के, ४४.७८ टक्के, अप्पर वैतरणा ३४.७०टक्के तर वांद्री धरणात ७७.८४टक्के पाणीसाठा झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

तीन ते चार दिवसांपासून कोसळलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर तलावात ५५.२३टक्के, तानसा धरणात ७०.७३टक्के, विहार ५३.९९ टक्के, तुळशी ७९.७०टक्के आणि मध्य वैतरणामध्ये ३१.५५टक्के पाणीसाठा झाला आहे

या वाढत्या पाणी साठ्याने ठाणेकर आणि मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. असाच पाऊस पडत राहिला तर लवकरच या धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी टंचाईतून काही अंशी सुटका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.