डोंबिवलीत भाजी विक्रेता महिलेचा मुलगा झाला सीए

डोंबिवली : डोंबिवलीजवळील खोणी गावात राहणारा तसेच एका गरीब भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा योगेश ठोंबरे हा सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

यशस्वी योगेशचे कौतुक कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ट्विट माध्यमातून केले आहे. सोशल मीडियावर या विषयी कौतुकाचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगेशच्या हुशारीची दखल घेऊन त्याचे अभिनंदन केले आहे. योगेश आपल्या आईला महाराष्ट्रातील देवदर्शन घडवून आणणार आहे.

विशेष म्हणजे योगेश सीए झाल्यावर या मुलांना त्याच्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंदाश्रू या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला.

सोमवारी योगेशने सीए झाल्यावर पहिली भेट म्हणून आपल्या आईला साडी गिफ्ट दिली. योगेशची आई निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. गेल्या 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकत आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते.
त्यावेळेला दोनशे रुपये उसने घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्या कष्टाचे चीज आज योगेशने केले आहे. योगेश सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला, हे ऐकल्यावर निरा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. साधारण परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्यानं घर, संसार सांभाळत हा व्यवसाय केला. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही.

याविषयी योगेश सांगतो, सीए बनायचं असं मनात ठरलं होतं. त्यानुसार नियोजन करून अभ्यास केला. मी निकालाची वाट बघत होतो, मात्र निकाल समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता सीए झाला. योगेशने आणि त्याच्या आईने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असून अनेक जुने ग्राहक, त्यांच्या मैत्रिणी, ओळखीतले त्यांना शोधत यांच्या भाजीच्या दुकानात येऊन त्यांचं अभिनंदन करीत आहेत.