ठाणे : उद्यापासून नवीन वर्षाला प्रारंभ होणार आहे. नवीन वर्षात २ सूर्यग्रहणे (२९ मार्च,२१ सप्टेंबर) आणि दोन चंद्रग्रहणे (१४ मार्च,७ सप्टेंबर ) अशी चार ग्रहणे होणार असली तरी ७ सप्टेंबरचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तर ५ नोव्हेंबर आणि ४ डिसेंबर या दिवशी दोन सुपरमून दिसणार आहेत.
सुपरमूनच्या वेळी चंद्र १४ टक्के मोठा आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसणार असल्याची माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली.
येत्या बुधवारपासून नूतन वर्ष २०२५ चा प्रारंभ होणार असून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती साजरी होणार असल्याचे सोमण यानी सांगितले. यावर्षी ३१ डिसेंबरला लिप सेकंद धरला जाणार नसल्याने नूतन वर्ष सन २०२५ चा प्रारंभ ठीक रात्री १२ वाजता होणार असल्याचेही श्री. दा.कृ.सोमण यांनी स्पष्ट केले. तसेच नवीन वर्षी २५ सुट्ट्या जाहीर झाल्या असून यातील चार सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. स्वातंत्र्यदिन-पारसी न्यू इयर एकाच दिवशी आले आहेत. तसेच दसरा आणि महात्मा गांधी जयंती एकाच दिवशी आल्याने चाकरमान्यांच्या एकूण सहा सुट्ट्या बुडणार आहेत. नूतन वर्षी १२ ऑगस्ट रोजी एकच अंगारकी संकष्टी चतुर्थी येणार आहे. २४ जुलै, २१ ऑगस्ट आणि १८ सप्टेंबर असे तीन गुरुपुष्यामृत योग येणार आहेत.
विवाहासाठी भरपूर मुहूर्त
नूतन वर्षी विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत. ५ जानेवारी, ११ फेब्रुवारी, ८ मार्च, ८ एप्रिल, १४ मे, ५ जून, ५ नोव्हेंबर आणि २ डिसेंबर असे एकूण ५८ विवाह मुहूर्त आहेत. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर विवाह मुहूर्त नाहीत.
इस्रो अंतराळवीरांसह गगनयान अंतराळात पाठविणार
नूतनवर्षी भारताची इस्रो ही अंतराळ संशोधन संस्था चार अंतराळवीर आणि व्योममित्रा ही रोबोट महिला घेऊन गगनयान अंतराळात यशस्वी उड्डाण करून परत पृथ्वीवर सुखरूप परत येणार आहेत, असेही खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.