संबंधितांना ठामपा बजावणार नोटीस
ठाणे : ठाण्यातील फ्लॉवर व्हॅलीजवळील होर्डिंग्स अवघ्या दीड वर्षात धोकादायक झाले असूनही त्यास सुदृढतेचा दाखला देण्यात आला आहे. या प्रकरणी जमीन मालक, कंत्राटदार आणि अहवाल देणाऱ्या अभियंत्याला ठाणे महापालिका नोटीस बजावणार असल्याचे कळते.
मंगळवारी दुपारी १२.२५च्या सुमारास ठाण्यातील फ्लॉवर व्हॅलीजवळ, रुणवाल नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग येथे साधना विला सोसायटीजवळ असलेले होर्डिंग धोकादायक स्थितीत असल्याचे राबोडी पोलीस ठाण्यातून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवण्यात आले. माहिती मिळताच पालिकेचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता (उथळसर प्रभाग समिती) तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह उपस्थित घटनास्थळी दाखल झाले. हे होर्डिंग धोकादायक असल्याचे घटनास्थळी आढळून आल्याने सदरचे होर्डिंग्स तत्काळ काढून टाकण्याच्या सूचना ठाणे महापालिकेने जागामालक आणि कंत्राटदाराला दिल्या आहेत.
या ठिकाणी २० बाय ४० चे दोन होर्डिंग्स आजूबाजूला असून दीड वर्षांपूर्वी हे होर्डिंग्स उभारायला परवानगी देण्यात आली होती. तसेच जाहिरात एजन्सीच्या अभियंत्यांमार्फतच स्टॅबिलिटी अहवाल तयार करण्यात आला होता. त्यामुळे आता जागामालक, कंत्राटदार आणि हा स्टॅबिलिटी अहवाल तयार करणाऱ्यालाही ठाणे महापालिकेच्या वतीने नोटीस काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
३१ ओव्हर साईज होर्डिंग्सला महापालिकेच्या नोटिसा
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून १८ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर ७० पेक्षा नागरिक या घटनेत जखमी झाले होते. तर ७४ पेक्षा अधिक वाहने या होर्डिंग्सखाली दबली गेली होती. या घटनेटनंतर सर्वच महापालिकांनी आपापल्या क्षेत्रात असलेल्या होर्डिंगचा स्टॅबिलिटी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर २९४ होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यापैकी जवळपास २०० होर्डिंग मालकांनी पालिका प्रशासनाकडे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केले आहे. मात्र ओव्हरसाईज होर्डिंग शहरात तसेच असल्याने अशा ३२ होर्डिंग्स धारकांना ठाणे महापालिकेने नोटीस काढली आहे. दुसरीकडे अशा ओव्हरसाईज होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेने एमएसआरडीसी, रेल्वे आणि एस.टी महामंडळाला देखील पत्र दिले आहे. एमएसआरडीसीच्या हद्दीत १८, एस.टी महामंडळाच्या हद्दीत २ तर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत १ होर्डिंग असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.