अल्पभूधारक शेतकऱ्यांचा गट शेतीचा यशस्वी प्रयोग

शेतकरी होणार कंपनी मालक
– राजेश जागरे-
शहापूर: कोकणातील शेतक-यांची जमीन धारणा अतिशय कमी असून पूर्वी एकरमध्ये असणाऱ्या जमिनी आता गुंठ्यावर आल्या आहेत. यामुळे शेती करताना अडचणी येतात. कमी शेती असेल तर बीज भांडवलासाठी आवश्यक कर्ज मिळत नाही. यंत्र-औजारे घेणे परवडत नाही, निविष्ठांच्या वाढत्या किमतीमुळे शेती परवडत नाही. या पार्श्वभूमीवर बबन हरणे यांनी डोळखांब परिसरातील शेतक-यांना गट शेतीचा कानमंत्र देवून त्यांना एकत्र आणून गट शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
डोळखांब परिसरातील शेतकरी भात पिकानंतर रब्बी हंगामात भाजीपाला करतात. परंतु कमी क्षेत्र असल्यामुळे केलेल्या शेतीतील उत्पादन व उत्पन्न यांची सांगड बसत नव्हती. महागडे भाजीपाला बियाणे, महागडी खते, औषधे व पाण्याची उपलब्धता नसणे तसेच विक्रीसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था नसणे यामुळे शेतकरी इच्छा असूनही भाजीपाला लागवड करत नसल्याचे चित्र निर्माण झाले. या अडचणी शेतक-यांनी बबन हरणे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी शेतक-यांना गट शेतीचा कानमंत्र देवून साईप्रसाद शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट हेदवलीच्या माध्यमातून शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून शेतक-यांना एकत्र आणले व सामुहिक पध्दतीने शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले.
20 शेतक-यांनी एकत्र येऊन 10 हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्याचे ठरले. भाजीपाला बियाणे, खते-औषधे खरेदी केल्याने त्यांना बाजारातील दरापेक्षा कमी दराने बियाणे, खते आणि औषधे उपलब्ध झाली. यातून शेतक-यांची चांगली बचत झाली. पाण्याच्या व्यवस्थेसाठी सर्व शेतक-यांनी एकत्र येऊन काही अंशी आर्थिक रक्कम काढल्याने पाण्यासाठीचे साहित्य खरेदी करता आले. एकाच ठिकाणी सर्व भाजीपाला लागवड असल्याने किड रोग व्यवस्थापन करणे सोपे झाले व किड रोग प्रमाण अतिशय कमी राहिले. उत्पादन झाल्यावर विक्रीसाठी शेतक-यांना कुठे बाहेर जावे लागले नाही. कारण एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवडीमुळे व्यापारी खरेदीसाठी जागेवर आले. यामुळे काढणीनंतरचा वाहतूक खर्चही वाचला.
घराजवळ हक्काची बाजारपेठ होणार
शेतक-यांमध्ये कधी नव्हे ती एकजूट आणि उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे. शेतकरी गट आता काकडी, वांगी, मिरची या पिकावर अवलंबून न राहता जिरेनिअम, मोगरा, सोनचाफा या पिकांकडे वळणार असून यातून तेल काढून सुगंधी द्रव्ये तयार करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी हरणे यांचे मार्गदर्शन सोबत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतकरी गटाची आता शेतकरी उत्पादक कंपनी होण्याची वाटचाल सुरू आहे. बबन हरणे यांनी शेतकरी गटाच्या माध्यमातून सुरू केलेले काम उत्पादक कंपनीच्या माध्यमातून चळवळ स्वरुपात मोठे होत आहे. फुलांपासून सुगंधी द्रव्ये निर्माण करण्याचा प्रकल्प हा तालुक्यातील पहिला शेतकरी प्रकल्प असेल व लवकरच तो पूर्णत्वास येईल पर्यायाने
शेतक-यांना घराजवळ हक्काची बाजारपेठ निर्माण होईल, फुलशेती माध्यमातून रोजगार निर्मिती होईल, अशी आशा बबन हरणे यांनी दैनिक ‘ठाणेवैभव’शी बोलताना व्यक्त केली.