कल्याण पूर्व मतदारसंघात महायुतीमध्ये बंडाची ठिणगी

कल्याण : भाजपाने यावेळी पुन्हा विद्यमान आमदारांना किंवा त्यांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली तर मी युती धर्म बाजुला ठेवून जनतेच्या भावनांचा विचार करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, असा इशारा कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडाची ठिणगी पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

एका खाजगी जागेच्या वादातून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यातच २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्या प्रकरणी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड सद्या तळोजा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तर त्यांचा पुत्र याच प्रकरणी फरार असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत महायुतीत कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेकडे घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. असे झालेच तर या मतदार संघातून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे तसेच विशाल पावशे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी त्यांनी काही महिन्यांपासून जोरदार तयारीही सुरु केली आहे. परंतु हा मतदारसंघ पुन्हा भाजपाकडेच जाण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे. या बाबत शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले की, हा मतदार संघ पुन्हा भाजपाकडेच राहिला तर युती धर्म म्हणून आम्ही युतीचे सर्वशक्तीनीशी काम करू, परंतु या मतदार संघातील गेल्या १५ वर्षाच्या विकास कामांचा विचार करता या मतदार संघाचा विकास झाला नसून हा मतदार संघ भकास झाला आहे. भाजपाने या मतदार संघातून जरूर आपला उमेदवार द्यावा परंतु त्याच व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबात उमेदवारी देऊ नये. कारण येथील जनतेला बदल हवा आहे. तसे न झाल्यास जनतेच्या भावनांचा विचार करून आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.