इमारतीला भीषण आग; चार सदनिका जळुन खाक

* अग्निशमन दलाच्या जवानांनी केली ४० रहिवाशांची सुटका
* बाळकूमच्या छबैय्या पार्कमधील घटना

ठाणे: बाळकूम येथील एका इमारतीला रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग एवढी भीषण होती कि या इमारतीच्या चार सदनिकांमधील सामान जळून खाक झाले आहे. तर इमारतीमधील जवळपास ३५ ते ४० रहिवाशांना अग्निशमन विभागाच्या जवानांनी वेळेत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. एक तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर अग्निशमन विभागाला नियंत्रण मिळवता आले.

ठाणे-भिवंडी रोडवरील बाळकूम, छबैया पार्क या ठिकाणी बिल्डिंग नं. ए /१ तळ अधिक सहा मजल्यांची इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका सदनिकेमध्ये आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. ही सदनिका गुरूदयाल सिंग यांच्या मालकीची असून काजल सनी प्रसाद यांना ही सदनिका भाड्याने राहायला दिली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बाळकुम अग्निशमन केंद्र अधिकारी निलेश वेताळ, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी मनोज लोणे आणि लिडिंग फायरमन, फायरमन आणि ड्रायव्हर हे चार फायर वाहन, एक वॉटर टँकर तसेच एक टी.टी.एल. वाहनासह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहन कापूरबावडी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले.

घटनास्थळी पोहचताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आग जास्त असल्याने या इमारतीमध्ये अडकलेल्या ३५ ते ४० रहिवाशांना वेळेत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या आगीत घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रूम नं. २०१ (मालक विलास साळवी) आणि रुम नं. २०२ (मालक तारा मिश्रा) या दोघांचा दरवाजा जळून खाक झाला आहे. रूम नं. २०३ (मालक गुरूदयाल सिंग) यांच्या घरातील सर्व लाकडी फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इलेक्ट्रिक वायरिंग जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रूम नं. २०४ (मालक गुरूदयाल सिंग) यांच्या घराचा मुख्य दरवाजा व दरवाजा जवळील काही साहित्य जळून नुकसान झाले आहे.