डोंबिवलीत दोन कंपन्यांना भीषण आग

डोंबिवली: एमआयडीसीतील ‘इंंडो अमाईन्स’ या किटकनाशक बनवणाऱ्या रासायनिक कंपनीत बुधवारी सकाळच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. आग लागताच इंंडो अमाईन्स कंपनीसह लगतच्या माल्दे कॅपीसिटर्स कंपनीमधील कर्मचारी तत्काळ कंंपनी बाहेर आल्याने मोठी जीवितहानी टळली. दोन्ही कंपन्यांचे आगीत मोठे नुकसान झाले.

गेल्या महिन्यात एमआयडीसीतील अमुदान कंंपनीत भीषण स्फोट होऊन डोंबिवली परिसर हादरला होता. या स्फोटात १६ कामगारांचा मूत्यू झाला होता. या स्फोटाने डोंबिवलीतील रहिवासी, उद्योजक अद्याप सावरले नसताना, बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास इंडो अमाईन्स कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंंतर कंपनीतील रासायनिक ज्वलनशील वस्तुंंना आग लागली. बघता-बघता आगीनं रौद्ररूप धारण केले.

इंडो अमाईन्स कंपनीत शेतीविषयक उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांनी भरलेले पिंप आगीने लपेटताच कंपनीत स्फोटांची मालिका सुरू झाली. सुरूवातीला कंपनी कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण करताच कर्मचाऱ्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

इंडो अमाईन्समधील कंपनीच्या झळा जवळच्या माल्दे कॅपीसिटर्स कंपनीला लागल्या. येथील सुमारे १८ कर्मचारी तत्काळ कंपनीतून बाहेर पडले. या कंपनीत मीटरला लावणारे कॅपीसिटर्स तयार केले जातात. वीज वाहक तारांचे गठ्ठे या कंपनीच्या आवारात होते. या कंपनीत ज्वलनशील सामान असल्याने माल्दे कॅपीसिटर्स कंपनीने पेट घेतला. या कंपनीतील प्लास्टीकने पेट घेताच काळ्या धुराचे लोळ आकाशाच्या दिशेने जात होते.

आगीची माहिती मिळताच सुरूवातीला कल्याण-डोंबिवली पालिकेचे तीन अग्निशमन बंंब घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांनी पाण्याचे फवारे मारून परिसरातील कंपन्यांमध्ये आग पसरणार नाही याची काळजी घेतली. आगीच्या ज्वालांवर फोमचे फवारे मारून आग विझवली जात होती. ऊन वाढत गेल्याने आगीचा भडका होण्याची शक्यता असल्याने आणखी आठ अग्निशमन बंब बोलावण्यात आले होते. चारही बाजूने इंडो अमाईन्स, माल्दे कंपनीच्या आगीवर जवानांनी पाण्याचा सततचा मारा केला. पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नसल्याने सुरूवातीला आजूबाजूच्या कंपनी मालकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परिसरातील नागरिक वस्त्यांमध्ये घबराट पसरली होती.

सततचा पाण्याचा मारा करून अग्निशमन जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले. दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापनांनी कंपनीत कोणीही कर्मचारी नसल्याची खात्रीशीर माहिती आपत्कालीन यंत्रणांना दिली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे एवढेच लक्ष्य आपत्कालीन यंत्रणांनी ठेवले होते. इंडो अमाईन्स, माल्दे कंपनीचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. इंडो अमाईन्स कंपनीत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून उत्पादन घेतले जाते. तरीही या कंपनीला आग कशी आग लागली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.