ठाणे: आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत ‘एकला चलो’चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरून मोठ्या प्रमाणात इन कमिंग सुरु केले आहे. युतीची बोलणी फिस्कटली तर महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिंदे यांची शिवसेना ताकदीनिशी मैदानात उतरल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे.
पुढील चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. राज्यात महायुतीची सत्ता असली तरी ठाणे महापालिकेत भाजपचे कमळ फुलविण्याची तयारी भाजपाने केली होती. त्यासाठी त्यांनी नवीन दमाचे मंडळ अध्यक्ष नियुक्त करून पक्ष मजबूत करण्यावर भर दिला होता तर वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात दोन वेळा जनता दरबार घेऊन सत्ताधारी शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला होता तर स्थानिक आमदार संजय केळकर हे प्रत्येक आठवड्याला जनता दरबार घेऊन शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडत नाही. ठाणे महापालिकेत महापौर बसवायचा असा चंग भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बांधला असून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. त्यामुळे भाजपाला चारी मुंड्या चित करण्यासाठी शिवसेना शिंदे गट महापालिका निवडणुकीत उतरणार आहे.
कळवा भागातील भाजपाच्या गळाला लागलेले ताकदवान माजी नगरसेवक शिंदे सेनेने आपल्याकडे खेचून घेतले. त्यामुळे कळवा भागात असलेल्या भाजपच्या पक्ष संघटनेला खीळ बसली आहे. माजी महापौरांसह सुमारे २४ सर्वपक्षीय नगरसेवक भाजपच्या वाटेवर होते परंतु भाजपाला वर्तकनगर भागातील एक माजी नगरसेविका आपल्या कळपात घेण्यात यश आले आहे, त्यामुळे शिंदे सेना आणखी काही विरोधी पक्षातील नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असून महायुती झाली नाही तर भाजपाच्याही काही पदाधिकारी आणि नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती शिंदे सेनेने आखली असल्याची माहिती सेनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला दिली आहे.
प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढविण्याची मुभा आहे. त्यादृष्टीने शिंदे यांची शिवसेना काम करत आहे. महायुती होणार कि नाही हे अजून जाहीर होणे बाकी असल्याचे भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.