संशयातून अल्पवयीन कबड्डीपटूची हत्या

कबड्डी प्रशिक्षकच निघाला खुनी

ठाणे: कबड्डीपटू असलेली आपली प्रेयसी वारंवार मोबाईल फोनवर बोलत असल्याच्या संशयाने पछाडलेल्या कबड्डीपटू प्रशिक्षकाने तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठाण्याच्या तरीचापाडा कोलशेत परिसरात शुक्रवारी (दि 27 मे) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास 17 वर्षीय अल्पवयीन कबड्डीपटू तरुणीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी सोमवार (दि 27 मे) रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव (२३) याला नवी मुंबईच्या घणसोली भागातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृतक अल्पवयीन मुलगी ही मिरज येथे कबड्डी खेळण्यासाठी गेली होती. तर कुटुंबातील सदस्य हे पुण्यात लग्नाला गेले होते. कबड्डी खेळून परतीच्या प्रवासात मुलीने आईला फोन केला होता. पुण्याला ये असे आईने सांगितले होते. परंतु, काम असल्याने घरी जाते असे सांगून तरुणी गुरुवारी रात्री कोलशेत परिसरातील घरी पोहचली होती. त्यानंतर शुक्रवारी (दि 24 मे) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तरुणीचा घरात मृतदेह सापडला.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक निधनाची नोंद केलेली होती. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात नेण्यात आला. तिच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्याने तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले. कापूरबावडी पोलिसानी तपासाअंती सोमवार (दि 27 मे) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश गंभीरराव याला अटक केल्याची माहिती, पोलीस निरीक्षक धांडे यांनी दिली. तर अटक आरोपी हा कबड्डी प्रशिक्षक असल्याची माहिती समोर येत असून प्रेमप्रकरणातून सदरची हत्या झाल्याची चर्चा आहे.