ठाणे: सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच गृहमंत्री अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढावे अशा मागण्या करत ठाण्यातील विविध राजकीय पक्ष, दलित, पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते.
परभणी येथे एका समाजकंटकाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली आणि त्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाला अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असे आरोप आंदोलकांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे ही फॅशन झाली आहे, असे केलेले विधान म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पर्यायाने देशाचा अपमान असल्याचा आरोप करत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी आंदोलकांनी केली. मोर्चात आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने मोर्चाचा मार्ग असलेला परिसर दणाणून गेला होता. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या मोर्चात ठामपाचे माजी स्थायी समिती सभापती भय्यासाहेब इंदिसे, माजी परिवहन समिती सभापती जितेंद्रकुमार इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, सुनील खांबे, सुखदेव उबाळे, भास्कर वाघमारे, आबासाहेब चासकर, पंढरीनाथ गायकवाड आदींसह शेकडो शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते.
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यु प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, त्याच्या कुटुंबियांना एक कोटीचे अर्थसहाय्य आणि शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.