युके ॲरोमॅटिकसह दोन कंपनीत भीषण आग

बोईसर-तारापूरमध्ये अग्नितांडव

बोईसर: आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक असलेल्या बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर के-6 मधील युके ॲरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
आज या कारखान्यातील कामगारांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र ही आग कशामुळे लागली हे कारण अजूनही अस्पष्ट आहे. हा केमिकलचा कारखाना असल्यामुळे आग झपाट्याने पसरल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही आग इतकी भीषण होती की आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ लांबून दिसत होते.
बोईसर तारापूर एमआयडीसीतील युके ॲरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या आगीचा भडका वाढल्याने कंपनीशेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली. यात श्री केमिकल कंपनी देखील आगीच्या भक्षस्थानी पडली. दरम्यान, अग्निशमनदलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने आगीनंतर कामगारांनी पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार अडकले नसल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. शिवाजीनगर बाजूचा रस्ता दुरुस्तीसाठी खोदल्याने टँकर आणि इतर वाहनांनाही आग विझवणाऱ्या वाहनांसाठी अडथळा निर्माण केला. यात परफ्युम आणि प्रेग्नेंसेस बनवणारा कारखाना होता. या कारखान्यामध्ये मोठा केमिकल साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.