कोकण पदवीधर मतदारसंघासाठी रस्सीखेच
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना तिसर्यांदा संधी मिळेल असे चित्र असताना मनसेने येथे उमेदवार जाहीर केला आहे. भरीस भर शिवसेना शिंदे गटही उमेदवारीसाठी आग्रह असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाने अजून आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला उमेदवार जाहिर केल्यामुळे महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडुकीत एकत्र एका मंचावर दिसणारे पक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत परस्परांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होणार्या मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधानपरिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. २६ जूनला ही निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०१८ मध्ये झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपात आलेले निरंजन डावखरे दुसर्यांदा निवडून आले होते. त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेतर्फे माजी महापौर संजय मोरे यांना संधी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी सोडल्यामुळे निरंजन डावखरे यांना घाम फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे नजीब मुल्लाही मैदानात उतरले होते. त्यावेळी निरंजन डावखरे यांना ३२,८३१ मते मिळाली तर संजय मोरे यांना २४,७०४ मते मिळाली. अवघ्या पाच ते सहा हजार मतांच्या फरकाने निरंजन डावखरे दुसर्यांदा निवडून आले. त्यावेळी शिवसेना भाजप युती होती. तरीही दोन्ही पक्षाने स्वतंत्र उमेदवार देत निवडणूक लढवली होती. यावेळीही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभेची जागा हट्टाने मागत येथे माजी महापौर नरेश म्हस्के यांना संधी दिली. एक शिलेदार दिल्लीत पाठवण्याची तयारी केली असताना आता दुसरा कट्टर समर्थक व अत्यंत विश्वासू अशा संजय मोरे यांना आमदार म्हणून विधानपरिषदेत पाठवण्याची रणनिती असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीतच या जागेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट व भाजप एकत्रित ही निवडणूक लढली तर यामध्ये भाजपच्या निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे शिवसेना शिंदे गट आपला हट्ट पूर्ण करणार की भाजप दावा सोडणार याकडेही लक्ष लागले आहे.
दरम्यान भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेची पायरी तिसर्यांदा चढण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मतदारसंघ त्यांनी बांधला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्याची शक्यताही कमी असल्याचे बोलले जाते. पण यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला बाहेरून पाठींबा देणार्या मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी देऊन आपला पत्ता फेकला आहे. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होणार की डाव रंगणार हे लवकरच कळेल.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपला महायुती म्हणून सहकार्य केले होते. भाजपकडे उमेदवार नसतानाही मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कमळ चिन्हावर पाठवले. आता त्या मोबदल्यात कोकण पदवीधर मतदारसंघ घेण्याच्या तयारीत शिवसेना शिंदे गट असल्याचे समजते. दुसरीकडे महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठींबा मनसेने दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीनेही बिनशर्त पाठींबा मनसेच्या उमेदवाला द्यावा अशी अपेक्षा मनसेच्या गोटातून व्यक्त होत आहे. या सर्वांमध्ये खरी कसोटी ही भाजपची लागणार असल्याचे दिसते.
२०१८ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होते. आता दोन्ही पक्षांचे दोन गट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाने अजून उमेदवारीसाठी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण या बदलत्या समिकरणामुळे महायुतीच्या मतांमध्येही विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात जर महायुतीचे प्रमुख दोन पक्षच परस्पर विरोधात लढले तर ही निवडणूक आणखी चुरशीची होत उमेदवारांना विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी मोठा घाम गाळावा लागणार आहे.