पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

भिवंडी : भिवंडीतील चर्नीपाडा परिसरात एका इमारतीमध्ये पाच वर्षांच्या बालिकेचा खेळता-खेळता पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही मुलगी आईसोबत शाळेतून आली असताना ती घरी जाण्याऐवजी सोसायटीतच खेळू लागली. खेळता-खेळता ती पाण्याच्या टाकीत पडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

भाग्यश्री ओझा (५) असे मृत मुलीचे नाव असून ती स्थानिक चर्नीपाडा परिसरात असलेल्या कृष्ण वाटिकामध्ये राहत होती. या इमारतीत नंदलाल ओझा हा त्याचा मोठा मुलगा आणि दोन मुलींसह पाच जणांसोबत रहात आहेत. नंदलाल सोमवारी सकाळी कामावर गेले होते. त्यांची सर्वात लहान मुलगी भाग्यश्री जवळच्याच एका शाळेत शिकायला गेली. दुपारी १२-३० वाजता तिची आई तिला शाळेतून घेऊन सोसायटीत आली. ती इमारतीच्या आवारात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पडली. काही वेळाने तिची आई तिला खाण्यासाठी घेऊन आवारात आली असता तीला भाग्यश्री कुठेच सापडली नाही. शोध घेतल्यानंतर सोसायटीच्या वॉचमनला इमारतीच्या आवारातील उघड्या पाण्याच्या टाकीतून तिची चप्पल सापडली. त्या आधारे बराच शोध घेतल्यानंतर मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आणि तिला उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी डॉक्टरांनी ती मृत असल्याचे घोषित केले. या घटनेची नारपोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे. सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे ही घटना घडली माहिती सूत्रांनी दिली आहे.