को.रे.च्या फुकट्या प्रवाशांकडून पावणे तीन कोटींचा दंड वसूल

महिन्याभरात १५ हजार प्रवाशांवर विक्रमी कारवाई

नवी मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. सुमारे १५ हजार १२९ प्रवाशांकडून दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या नेहमीच फुल असतात. सणवाराला या मार्गावरील गाड्यांचे तिकीट आधीच फुल होत असल्याने तिकीट मिळणे कठीण होऊन जाते. त्यामुळे या गाड्यांना होणारी गर्दी पाहता बरेच प्रवासी या गाड्यांतून फुकट प्रवास करतात. अशा प्रवाशांविरोधात कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे.

एप्रिल २०२४ मध्ये एकूण १५,१२९ अनधिकृत/अनियमित प्रवासी विना तिकीट आढळून आल्याने त्यांच्याकडून एकूण दोन कोटी ६९ लाख ८५ हजार २५६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोकण रेल्वेवरील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दंड आहे.

अवघ्या एका महिन्यात झालेल्या कारवाईचा हा तपशील असून कोकण रेल्वे नियमित प्रवाशांच्या पुरेशा सोयीसाठी तिकीट तपासणी मोहीम यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.